मराठी आर्टिकल लिहिन्याचा हा पहिलाच प्रयत्न
एक प्रवास व आपल्या बालपनीची आठवण करुन देणारे आर्टिकल
प्राथमिक शाळेत २-३ वर्षे आम्हाला पेन वापरायला चालत नव्हतं. पेन्सिलच वापरावी लागायची. लहान मुलं चुका खूप करतात, आणि त्यांना त्या खोडून सुधारता याव्यात म्हणुन पेन्सिल वापरावी असं सांगायचे. म्हणजे वहीत आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड जास्त दिसणार नाही. जेव्हा पेन वापरायला परवानगी मिळाली तेव्हा पुन्हा बजावण्यात आलं कि आता तुम्ही मोठे झालात (तिसरी का चौथीमधेच), तुम्ही खाडाखोड करू नये अशी अपेक्षा आहे.
तेव्हा रेनॉल्ड्सपासूनच पेनने लिहिण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. तेव्हापासून शाळेत असेपर्यंत आम्हा मुलांमध्ये कपड्यांसारखी पेनचीसुद्धा फॅशन यायची जायची.
शाई पेनने अक्षर चांगले येते असा एक समज होता. म्हणून तो प्रयोग करून झाला. मग शाई पेन असेल तर शाईची बाटली बाळगणे, सांडणे, शाईचे डाग गणवेशावर पाडणे, शाई दुसऱ्यांवर उडवणे, शाई संपली म्हणून एकमेकांकडे पेन पेन्सिल मागणे असे सगळे प्रकार करून झाले.
टोपण असलेल्या पेन सोबतच जेटरसारखे खटका दाबून उघडायचे पेनसुद्धा होते. टोपण पडायचे किंवा हरवायचे म्हणून हे पेन सोयीचे वाटायचे. पण ते चुकून उघडे राहिले तर खिशाला डाग लागायचे.
खटका असलेल्या पेनमधेच दोन तीन रंगाच्या रिफील असलेले पेनपण हटके म्हणून भाव खाऊन जायचे. असा पेन घेऊन मग उत्तर लिहिताना महत्वाचे मुद्दे वेगवेगळ्या रंगाच्या शाईने अंडर लाईन करता यायचे.
हायस्कुलमध्ये पोचेस्तोवर ऍडजेलमुळे आम्हाला जेलपेनची ओळख झाली. जेल पेन मग काही दिवस भरपूर लोकप्रिय झाले. त्याने लिहिलेल्या कागदाला बॉल पेनने लिहिलेल्या कागदापेक्षा एक वेगळीच चकाकी यायची. आणि काही दिवस अक्षर सुधारल्यासारखे वाटायचे. असेच काही पायलटपेनसुद्धा उपलब्ध होते.
एकीकडे हे उच्च श्रेणीतले पेन येत असताना बाजारात २ रुपयाचे वापरून फेकून देण्याचे पेन यायला लागले. १० रुपयाचा पेन घेणं जमत असतानासुद्धा मुलं सगळे वापरतायत म्हणून हे २ रुपयाचे पेन वापरायला लागले. तेव्हापासून हे पेन, ऑफिसमध्ये वाटप करताना, सेमिनारमध्ये, ट्रेनिंगमध्ये असा सर्व ठिकाणी वापरात दिसत आहेत.
एक रायटोमीटर नावाचा पेन आला होता. ह्याची जाड रिफील खूप दिवस चालायची. एका रिफील मध्ये तुम्ही १०००० मीटर, म्हणजेच १० किमी म्हणजेच माउंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता असा त्यांचा दावा होता. त्या रिफील वर एक स्केलसुद्धा होती, १०००० मीटर दाखवणारी. म्हणूनच नाव रायटोमीटर. तोसुद्धा मी वापरून पाहिला. आणि खरंच एकच रिफील काही महिने चालली. त्या पेनचा रंग उडाला, टोपण तुटलं, पेन लूज झाला, तरी ती रिफील संपेना. शेवटी कंटाळून मी तो फेकून दिला. कदाचित नोट्स वगैरे काढून लिहून अभ्यास करण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्याकडून लवकर संपला असता.
माझ्या वर्गातल्या बऱ्याच जणांचा सेलो ग्रीपर हा पेन आवडता होता. मला स्वतःला सेलोचाच सेलो पिनपॉईंट हा पेन आवडता होता. आणि त्याच प्रकारचा सेलो टेक्नोटीप हा पेन मला जास्त आवडला, आणि तोच मी आजतागायत वापरतोय.
पण शिक्षण संपलं कि लिहिण्याची सवय सुटली. आता ब्लॉगसुद्धा संगणकावर लिहितात लोक. त्यामुळे आजकाल मला लेखनाची आवड आहे म्हणण्यापेक्षा टंकनाची आवड आहे म्हटलेले जास्त बरोबर ठरेल. 😀
असो. तर माझा आवडता टेक्नोटीप घरी विसरल्यामुळे मला मित्रकधुन रेनॉल्ड्स पेन मागून घ्यावा लागला. तो पेन पाहून पेन या विषयावर गप्पा झाल्या, आणि हे स्मरण रंजन झाले.